अन्यमहाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त पाचोर्‍यात विधी सेवा शिबिर उत्साहात; विधी सेवा समिती आणि रोटरी क्लब तर्फे १४० ज्येष्ठ नागरिकांना कायदेशीर मार्गदर्शन

पाचोरा – आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त पाचोरा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयांतर्गत कार्यरत तालुका विधी सेवा समिती आणि रोटरी क्लब पाचोरा-भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच माऊली ज्येष्ठ नागरिक संस्था यांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेले विधी सेवा शिबिर उत्साहात पार पडले.

शहरातील माऊली ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या ‘विरंगुळा’ सभामंडपात आयोजित या शिबिराच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष राजाराम नागो सोनार होते. बार असोसिएशनचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. प्रशांत मालखेडे आणि रोटरी क्लब पाचोरा-भडगावचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लबचे सचिव डॉ. प्रशांत सांगडे, माजी अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, माजी सचिव डॉ. अजय परदेशी, ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष डॉ. अनिल देशमुख, रोटरीचे ज्येष्ठ सदस्य चंद्रकांत लोढाया, माऊली संस्थेचे सचिव के. एस. महाजन, डॉ. भरतकुमार प्रजापत, डॉ. प्रशांत विसपुते, डॉ. नंदकिशोर पिंगळे, अजहर खान, प्रकाश विसपुते, ॲड. मंगेश सांगडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क, वैयक्तिक वाद निवारणाच्या पद्धती, मानसिक आजार व मानसिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी उपलब्ध विविध योजना, आदिवासी हक्कांचे संरक्षण व कार्यवाही, तसेच वैकल्पिक वाद निवारण प्रणाली यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी मार्गदर्शनाचा लाभ घेत विविध कायदेशीर शंकांचे निरसन करून घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधाकर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश विसपुते यांनी केले, तर के. एस. महाजन यांनी आभार मानले. या विधी सेवा शिबिराला सुमारे १४० ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लाभली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button