डॉ. शिवाजी शिंदे यांची पाचोरा कन्या विद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती

पाचोरा – नगरदेवळा येथील विश्वासराव पवार ट्रस्ट संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, पाचोरा येथे विद्यार्थिनींच्या शैक्षणिक, बौद्धिक व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा नेतृत्वबदल घडून आला आहे. विद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी अभ्यासू, अनुभवी व बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले शिक्षणतज्ज्ञ डॉ. शिवाजी शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
यापूर्वी कार्यरत असलेल्या प्राचार्या श्रीमती उज्वला देशमुख या सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर पदोन्नतीने डॉ. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिक्षण क्षेत्रातील तब्बल ३१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. शिवाजी शिंदे हे नामांकित गिरणाई शिक्षण संस्थेचे सहसचिव म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांनी इंग्रजी विषयात एम.ए., बी.एड. पदवी संपादन केली असून, त्यासोबतच अल्टरनेटिव्ह मेडिसिनमध्ये एम.डी. तसेच ॲक्युप्रेशर विषयात पीएच.डी. अशी उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त केली आहे.
एक उत्कृष्ट शिक्षक म्हणून ओळख असलेले डॉ. शिंदे हे नामांकित पत्रकार, संवेदनशील कवी, प्रभावी निवेदक व अभ्यासू विचारवंत म्हणूनही समाजात परिचित आहेत. आधुनिक शिक्षण पद्धतींचा अवलंब, नैतिक मूल्यांची जपणूक, शिस्त व संस्कार यांचा समतोल राखत विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले आहेत.
डॉ. शिवाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा कन्या विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच भर पडेल, असा विश्वास व्यक्त होत असून, त्यांच्या या नियुक्तीबद्दल शिक्षण, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





