छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून नागरिकांच्या प्रश्नांना मिळणार तातडीने दिशा; ३० जुलै रोजी पाचोऱ्यात आयोजन

पाचोरा –
शासनाच्या विविध विभागांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारी, समस्या व प्रलंबित प्रकरणांचे एकाच ठिकाणी प्रभावीपणे निराकरण व्हावे या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दि. ३० जुलै २०२६ रोजी पाचोरा येथे होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये महसूल, ग्रामविकास, पंचायत राज, सामाजिक न्याय, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, वीज, पाणीपुरवठा तसेच इतर विविध शासकीय विभागांच्या योजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच प्रलंबित अर्ज, तक्रारी आणि विविध शासकीय कामांशी संबंधित प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांकडून तत्काळ कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि नागरिकांना एकाच ठिकाणी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती देण्याबरोबरच आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शनही केले जाणार आहे.
प्रशासनाने नागरिकांना आपल्या समस्या, अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमामुळे अनेक प्रलंबित प्रश्नांना गती मिळून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






