छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ५ हजारांहून अधिक नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ

पाचोरा – महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर गुरुवारी (दि. ३० जुलै) महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ, गिरड रोड, पाचोरा येथे उत्साहात पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी पात्र नागरिकांना देण्यात आला.

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिराला जिल्हाधिकारी रोहन युगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर दीपप्रज्वलन करून स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शिबिरात ग्रामीण व शहरी भागातील सुमारे ५ हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला. महसूल विभागामार्फत संजय गांधी योजनेचे लाभार्थी, पंचायत समितीमार्फत घरकुल लाभार्थी, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना अनुदान व शेती अवजारे, शिक्षण विभागामार्फत दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य, नगरपालिका मार्फत बँक लिंकेज कर्ज व प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ, तर पशुसंवर्धन विभागामार्फत शेळीगटांचे वाटप करण्यात आले. विविध विभागांच्या योजनांचे लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व साहित्याचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरस्थळी महसूल, कृषी, पंचायत समिती, पुरवठा, महावितरण, वन, भूमी अभिलेख, परिवहन, पोलीस, आरोग्य, महिला व बाल विकास, शिक्षण, पशुसंवर्धन, नगरपालिका, राष्ट्रीयीकृत बँका, बीएसएनएल आणि उमेद अभियान यांसह विविध विभागांचे माहिती व सेवा स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉलवर नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देत अर्ज स्वीकारण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी केले. यावेळी जिल्हा व तालुकास्तरीय विविध विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय ठाकूर व विनोद धनगर यांनी केले.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत जलद व पारदर्शक पद्धतीने पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या समाधान शिबिराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.






