अन्यमहाराष्ट्रराष्ट्रीय

सोळा वर्षांची निस्वार्थ जलसेवा : सावखेडा काळभैरव यात्रेत ‘अक्वा’ पिण्याच्या पाण्याचा आधार

  1. पाचोरा – तालुक्यातील सावखेडा येथील काळभैरव यात्रेत गेली सोळा वर्षे अखंड सुरू असलेली निस्वार्थ जलसेवा आज सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण ठरत आहे. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने, तसेच शिवश्री दीपक हरी पाटील यांच्या आर्थिक सहकार्याने राबविण्यात येणारी ही शुद्ध व थंड ‘अक्वा’ पिण्याच्या पाण्याची सेवा हजारो भाविकांसाठी दिलासादायक ठरली आहे.
    दरवर्षी पौष महिन्यात सावखेडा येथील काळभैरव मंदिर परिसरात भव्य यात्रा भरते. जळगाव, धुळे, संभाजीनगर, बुलढाणा आदी जिल्ह्यांसह परिसरातील लाखो भाविक श्रद्धेने दर्शनासाठी दाखल होतात. दर्शनानंतर वरण-भात, बट्टी, वांग्याची भाजी तसेच कबूल वजनाइतका गूळ अर्पण करण्याची परंपरा आहे. मात्र, यात्रेत पिण्याच्या पाण्याची ठोस व्यवस्था नसल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
    याच पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली ही पाणपोळी व जलसेवा यात्रेतील एकमेव विश्वासार्ह आधार ठरली आहे. संपूर्ण यात्रास्थळी उभारलेला हा मंडप कोणत्याही प्रसिद्धीशिवाय, “पाणी हीच खरी सेवा” या भावनेतून निस्वार्थपणे चालवला जात आहे. कडाक्याचे ऊन, प्रचंड गर्दी आणि सतत चालणाऱ्या दर्शन रांगेत ही जलसेवा भाविकांसाठी खऱ्या अर्थाने जीवनदायी ठरत आहे.


विशेषतः वयोवृद्ध, महिला व लहान मुले या सेवेकडून मोठ्या प्रमाणावर लाभ घेताना दिसतात. अनेक भाविक कार्यकर्त्यांना मनापासून शुभाशीर्वाद देत समाधान व्यक्त करतात. “देव तुमचं भलं करो” असे शब्द या उपक्रमाचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करतात.
या सेवेसाठी भैरवनाथ मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन पाटील, सचिव सुनील परदेशी, ट्रस्ट सदस्य प्रकाश परदेशी, पदम परदेशी, प्रकाश पाटील, संजय सोनवणे, देवीलाल परदेशी यांचे सहकार्य लाभत आहे. तसेच संभाजी ब्रिगेडचे राजेंद्र सुखदेव पाटील, पोलिस नाईक दीपक पाटील, पोलिस कर्मचारी शाम हटकर, व्यापारी नितीन चौधरी, माणिक पाटील, संतोष पाटील, उद्योजक समर्थ दीपक पाटील, राका जी यांच्यासह अनेक कार्यकर्ते अहोरात्र सेवा बजावत आहेत.
लाखो भाविकांच्या गर्दीत कोणताही स्वार्थ न ठेवता केली जाणारी ही सेवा समाजातील माणुसकीचे दर्शन घडवते. पाण्याच्या एका घोटातून मिळणारा दिलासा आणि समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश असून, सावखेडा काळभैरव यात्रेतील ही जलसेवा आज संपूर्ण पाचोरा तालुक्यासाठी अभिमानास्पद ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button