API कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; गुन्हेगारीवर लगाम, जनतेचा विश्वास दुणावला

पाचोरा – पोलीस दलाचे खरे यश केवळ गुन्हे दाखल करण्यात नसून समाजात कायद्याचा धाक निर्माण करत नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात असते. पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) कल्याणी वर्मा यांनी पदभार स्वीकारून एक वर्ष पूर्ण केले असून, या कालावधीत कठोर कायदा अंमलबजावणी, संवेदनशील जनसंपर्क आणि प्रभावी कम्युनिटी पोलीसिंगच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘दिव्य मराठी’ दैनिकाने त्यांना ‘जिल्ह्यातील उत्कृष्ट महिला प्रभारी अधिकारी’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. कायद्याचा कठोर बडगा उगारतानाच सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूक देणे, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण समाजाशी विश्वासाचे नाते निर्माण करणे, ही त्यांच्या कार्यशैलीची विशेष ओळख ठरली आहे.
अवैध धंद्यांवर धडक कारवाया
API कल्याणी वर्मा यांच्या नेतृत्वाखाली अवैध दारू, हातभट्टी, गुटखा, जुगार, गोमांस विक्री, अनैतिक मानवी व्यापार आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात सातत्याने धडक कारवाया करण्यात आल्या.
मुख्य कामगिरी :
– अवैध दारूचे २०० हून अधिक गुन्हे दाखल
– २० लाख रुपयांहून अधिक किमतीची अवैध दारू जप्त व नष्ट
– जुगाराचे ९० हून अधिक गुन्हे दाखल
– १० लाख रुपयांपेक्षा अधिक रोकड व साहित्य जप्त
या कारवायांमुळे अनेक गावांतील महिलांनी स्वखुशीने पोलीस ठाण्यात येऊन API कल्याणी वर्मा यांचा सत्कार केला. पोलिसांच्या कामगिरीबद्दल जनतेने स्वतःहून कृतज्ञता व्यक्त करण्याची ही दुर्मिळ घटना ठरली.
महिलांचा वाढता विश्वास
पूर्वी पोलीस ठाण्यात जाण्यास संकोच करणाऱ्या महिला आज अन्यायाविरोधात निर्भीडपणे तक्रारी नोंदवत आहेत. महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार आणि छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये संवेदनशीलतेने हस्तक्षेप करून अनेक पीडितांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे अनेक महिलांनी त्यांना “आमच्या हक्काची बहीण” अशी भावना व्यक्त केली.
थेट संवादामुळे जनतेशी घट्ट नाते
API कल्याणी वर्मा यांनी स्वतःचा संपर्क क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करून देत कोणतीही माहिती किंवा तक्रार थेट देण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे अनेक गुन्ह्यांचा वेळेत उलगडा झाला असून नागरिक आणि पोलिसांमधील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
युवक व विद्यार्थ्यांचे प्रबोधन
शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन सोशल मीडियाचे दुष्परिणाम, सायबर गुन्हे, व्यसनमुक्ती, महिला सुरक्षा, बालविवाह प्रतिबंध आणि कायद्याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच ग्रामीण भागातील युवक-युवतींना पोलीस भरतीसाठी विनामूल्य मार्गदर्शनही करण्यात आले.
प्रतिबंधात्मक कारवायांवर भर
महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच BNSS अंतर्गत वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. अनेक सराईत गुन्हेगारांवर तडीपारसह विविध कायदेशीर कारवाया करून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात यश आले.
क्लिष्ट गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा
POCSO प्रकरणात अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देणे, बेपत्ता व्यक्तीच्या अंध खुनाचा छडा लावणे, कौटुंबिक खुनांच्या गुन्ह्यांचा अल्पावधीत उलगडा करणे अशा अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये API कल्याणी वर्मा यांनी आपल्या तपास कौशल्याची प्रभावी छाप पाडली.
पुनर्वसनाचा मानवी दृष्टिकोन
केवळ गुन्हे दाखल करण्यावर भर न देता समुपदेशन आणि कायद्याचा धाक यामुळे अनेकांनी अवैध व्यवसाय कायमचे बंद करून भाजीपाला, फळविक्री, चहाची टपरी तसेच इतर कायदेशीर व्यवसाय सुरू केले. गुन्हेगारीतून सन्मानाच्या उपजीविकेकडे वळविण्याचा हा प्रयत्न त्यांच्या कार्यपद्धतीचे वेगळेपण अधोरेखित करतो.
पत्रकारांचे मत
अवघ्या एका वर्षात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याने केवळ गुन्हे उघडकीस आणण्यापुरते काम मर्यादित ठेवले नाही, तर पोलीस आणि जनता यांच्यात विश्वासाचे मजबूत नाते निर्माण केले. अवैध धंद्यांवरील कठोर कारवाया, महिलांना दिलेले आत्मबळ, युवकांचे प्रबोधन, प्रभावी कम्युनिटी पोलीसिंग आणि गुन्हेगारीविरोधातील सातत्यपूर्ण लढा यामुळे API कल्याणी वर्मा यांनी “कर्तव्य, संवेदनशीलता आणि धाडस” यांचा आदर्श समतोल साधत पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात खऱ्या अर्थाने “खाकीचा सुवर्णकाळ” निर्माण केल्याची भावना परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.






