अन्यमहाराष्ट्रराजकीय

जितेंद्र जैन यांची श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुखपदी बिनविरोध निवड

पाचोरा –  श्रमिकांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारे, युवकांचा बुलंद आवाज म्हणून ओळख असलेले व जळगाव–पाचोरा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. किशोर आप्पा पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेले जळगाव युवा सेना जिल्हाध्यक्ष मा. जितेंद्र जैन यांची श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुखपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे उत्तर महाराष्ट्रातील कामगार चळवळीला नवे बळ मिळाले आहे.

मा. जितेंद्र जैन हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय तसेच कामगार क्षेत्रात सक्रिय आहेत. विशेषतः असंघटित कामगार, कष्टकरी वर्ग, युवकांचे प्रश्न, बेरोजगारी, वेतनवाढ, सामाजिक न्याय अशा विविध विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, संघटन कौशल्य आणि थेट जनसंपर्क यांचा प्रभावी मिलाफ पाहायला मिळतो.

श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेत त्यांनी यापूर्वीही विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून संघटन विस्तार, कामगार नोंदणी, आंदोलनांचे नियोजन आणि प्रशासनाशी समन्वय साधण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या संघर्षशील नेतृत्वगुणांवर, संघटनात्मक बांधिलकीवर व श्रमिकांच्या हक्कासाठी सातत्याने उभ्या राहिलेल्या लढ्यावर विश्वास ठेवूनच त्यांची उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुखपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

या नव्या जबाबदारीमुळे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकसह अन्य जिल्ह्यांतील कामगार प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, तसेच संघटना अधिक बळकट केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कामगारांच्या न्याय्य मागण्या, वेतन, सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ आणि प्रशासनाकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात अधिक आक्रमक व संघटित भूमिका घेतली जाईल, असेही संकेत मिळत आहेत.

मा. जितेंद्र जैन यांच्या निवडीचे वृत्त समजताच विविध सामाजिक, राजकीय व कामगार संघटनांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी ही निवड म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील श्रमिक चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असल्याची भावना व्यक्त केली आहे. युवक वर्गातही या निवडीबद्दल विशेष उत्साह पाहायला मिळत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार प्रश्नांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

उत्तर महाराष्ट्रातील श्रमिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे आणि ताकदीने काम करू, अशी भावना मा. जितेंद्र जैन यांनी व्यक्त केली असून, संघटनेने दिलेल्या विश्वासाला न्याय देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button