अन्यमहाराष्ट्र

मोंढाळे येथे अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा अखंड; ५८ वे वर्ष श्रद्धा, एकी व भक्तिभावाचे दर्शन

पाचोरा  – पाचोरा तालुक्यातील बांधकाम व उत्कृष्ट शेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या मोंढाळे गावात सन १९६७ पासून अखंड सुरू असलेला हरिनाम कीर्तन सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण निरूपण सोहळा यंदाही अत्यंत भक्तिभावपूर्ण, मंगल आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या अध्यात्मिक परंपरेचे यंदा गौरवशाली ५८ वे वर्ष होते.

भागवत धर्माची पताका उंचावणारा हा संस्कारमय सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक ऐक्य, एकोप्याचे आणि संस्कृतीचे प्रतीक बनला आहे. सप्ताहकाळात संपूर्ण मोंढाळे गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, युवक व बालगोपालांचा उत्स्फूर्त सहभाग हे या सप्ताहाचे वैशिष्ट्य ठरले.

सप्ताहाच्या निमित्ताने श्री हनुमान मंदिर, श्री भवानी मंदिर तसेच संपूर्ण गाव स्वच्छ व सुशोभित करण्यात आले होते. सर्वत्र भक्तिमय, प्रसन्न व मंगल वातावरण अनुभवायला मिळाले. ग्रामस्थांच्या एकीचे व सामाजिक सलोख्याचे अलौकिक दर्शन या सप्ताहातून घडले.

दिनांक २२ रोजी काकड आरती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व ह.भ.प. पोपट महाराज कासारखेडेकर यांच्या कीर्तनाने सप्ताहाची सुरुवात झाली. त्यानंतर

ह.भ.प. राजेंद्र महाराज की कथा (निंभोरे),

ह.भ.प. विकास महाराज मुरदडकर,

ह.भ.प. गणेश महाराज काचोळे पौरीकर,

ह.भ.प. पांडुरंग महाराज आवारकर,

ह.भ.प. परमेश्वर महाराज उगले (तळवाडे, नांदगाव),

ह.भ.प. योगेश महाराज धामणगावकर व

ह.भ.प. छगन महाराज खडके (संगमनेर)

यांच्या प्रभावी कीर्तनसेवेने संपूर्ण सप्ताह भक्तिरसाने भारावून गेला.

दिनांक ३० रोजी हरिभक्त परायण ह.भ.प. छगन महाराज खडके यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची भावपूर्ण सांगता झाली.

या पवित्र कीर्तन सोहळ्यास पाचोरा तहसीलदार मा. श्री विजयजी बनसोडे साहेब यांनी आवर्जून उपस्थित राहून भाविकांशी संवाद साधत, या अखंड हरिनाम परंपरेचे कौतुक केले. शासन-प्रशासन पातळीवरून अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांना मिळणारा पाठिंबा समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. त्यांच्या उपस्थितीमुळे सोहळ्याची शोभा अधिकच वाढली.

आर्वे, वानेगाव, राजुरी, निंभोरे, तांडा, वाडी शेवाळे, लोहारी, डोंगरगाव, शिंदाड, कृष्णापुरी, पाचोरा, त्रंबकनगर, सारे पिंपरी, सातगाव, वडगाव, गोराडखेडा, मोहाडी, सावखेडा, अंतुर्ली आदी पंचक्रोशीतील भजनी मंडळी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सप्ताह यशस्वी करण्यासाठी मोंढाळे ग्रामस्थांनी एकदिलाने, निःस्वार्थपणे केलेले सहकार्य उल्लेखनीय ठरले. अखंड हरिनाम सप्ताहाने अध्यात्म, परंपरा, सामाजिक ऐक्य आणि संस्कार यांचा आदर्श पुन्हा एकदा समाजासमोर सशक्तपणे मांडला, असेच म्हणावे लागेल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button