प्रशासन, पोलीस व कर्मचाऱ्यांचे उत्कृष्ट नियोजन; नागरिकांचे सहकार्य कौतुकास्पद

पाचोरा – पाचोरा नगरपरिषद निवडणूक २०२५ पाचोरा शहरात अत्यंत शांततामय, निर्भय व लोकशाही मूल्यांचे पालन करत यशस्वीरीत्या पार पडली. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने केलेले काटेकोर नियोजन, सतर्कता व समन्वय विशेष उल्लेखनीय ठरले.
निवडणूक कालावधीत पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. बापू रोहम, पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. योगेश गणगे, श्री. संजय निकम, श्री. सुनील पाटील, श्री. कृष्णा घायाळ यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड पथकाने रात्रंदिवस सेवा बजावत कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे राखली. त्यांच्या सतर्कतेमुळे कोणतीही अनुचित घटना न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
तसेच निवडणूक अधिकारी श्रीमती अर्चना मोरे, तहसीलदार श्री. विजय बनसोडे व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. मंगेश देवरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली महसूल विभाग, नगरपरिषद विभाग व संबंधित सर्व कर्मचाऱ्यांनी अत्यंत जबाबदारीने, नियोजनबद्ध व पारदर्शक पद्धतीने आपले कर्तव्य बजावले. मतदान केंद्र व्यवस्थापन, मतदारांना योग्य मार्गदर्शन, शिस्तबद्ध प्रक्रिया व प्रशासकीय समन्वयामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह ठरली.
या निवडणुकीत सहभागी सर्व पोलीस कर्मचारी, महसूल व नगरपरिषद कर्मचारी, निवडणूक यंत्रणा तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांनी केलेले अथक परिश्रम लोकशाही बळकट करणारे असून त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.
तसेच शांतता राखून प्रशासनास सहकार्य करणाऱ्या पाचोरा शहरातील सर्व जागरूक नागरिकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
लोकशाहीचा हा उत्सव शांततेत व यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व घटकांचे मनापासून अभिनंदन व आभार.






