पाचोरा महाविद्यालयाच्या कु.चेतना रणदीप हिरे ची राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत बाजी

पाचोरा – दि . 7 जानेवारी झालेल्या राष्ट्रीय कॉलेज, चाळीसगाव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हिरे हिने आपल्या प्रभावी वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर उत्तेजनार्थ क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
या स्पर्धेत “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : शिक्षणातील क्रांती की गोंधळ?” या ज्वलंत व चिंतनशील विषयावर चेतनाने अभ्यासपूर्ण, मुद्देसूद व प्रभावी वकृत्व सादर केले. तिच्या भाषणातील स्पष्ट विचार मांडणी, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि विषयाची सखोल मांडणी यामुळे परीक्षक व उपस्थित श्रोते प्रभावित झाले.
या उल्लेखनीय यशाबद्दल कु. चेतना हिरे हिला सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह तसेच रोख रक्कम रुपये १५००/- देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी संघप्रमुख म्हणून प्रा. सुजाता पवार, प्रा. जयश्री वाघ तसेच प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी यांनी चेतनाला वेळोवेळी मार्गदर्शन करून तिच्या तयारीला योग्य दिशा दिली.
चेतनाच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील परंपरेला नवी ऊर्जा मिळाली असून तिच्या या यशाबद्दल महाविद्यालय व संस्थेच्या परिवारातर्फे तिचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक करण्यात आले.






